Menu

अनुवाद 6

CBI

1 यार्देन ओलांडून त्या वचनदत्त देश ताब्यात घ्यायचा आहे, त्या देशात तुम्हाला पाळावयास शिकविण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने मला सांगितलेल्या आज्ञा, विधी व नियम हे आहेत, 2 यासाठी की तुम्ही, तुमचे पुत्र, पौत्रे यांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. मी तुम्हाला दिलेले सर्व नियम व आज्ञा तुम्ही पाळत राहाल तर तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घ्याल. 3 म्हणून इस्राएली लोकहो ऐका आणि काळजीपूर्वक आज्ञा पाळा म्हणजे तुमचे भले होईल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे दूध व मध वाहणार्‍या देशात तुम्ही बहुगुणित व्हाल. 4 हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत. 5 याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा. 6 या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. 7 त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. 8 त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. 9 त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा. 10 जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील, 11 तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल, 12 ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या. 13 तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी. 14 इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका; 15 कारण याहवेह तुमचे परमेश्वर, जे तुम्हामध्ये आहेत, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत, यामुळे त्यांचा राग भडकेल व ते तुम्हाला या पृथ्वीवरून नष्ट करून टाकतील. 16 मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका. 17 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाव्या आणि त्यांची बोधवचने व नियमांचेही जपून पालन करावे. 18 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य व चांगले आहे तेच करा, तर तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुम्ही जाल व तो देश तुम्ही ताब्यात घ्याल. 19 याहवेहने सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्व शत्रूंना तुमच्यापुढून घालवून द्या. 20 भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?" 21 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. 22 आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले. 23 त्यांनी आम्हाला इजिप्तमधून यासाठी बाहेर आणले की, आमच्या पूर्वजांना जो देश देण्याचे त्यांनी शपथपूर्वक वचन दिले होते, त्या देशात आम्हाला आणावे. 24 याहवेहने आम्हाला सर्व नियम पाळण्याची आज्ञा दिली आणि याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, जेणेकरून आपले निरंतर कल्याण व्हावे आणि स्वतःस जिवंत राखावे, जसे आजवर आहोत. 25 आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल."

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate