Menu

स्तोत्रसंहिता 16

CBI

1 परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. 2 मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही." 3 पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे." 4 जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही. 5 याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता. 6 माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे. 7 मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते. 8 मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. 9 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल. 10 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही. 11 तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate