स्तोत्रसंहिता 30
CBI1 याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही. 2 हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले. 3 याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले. 4 अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. 5 त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल. 6 माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही." 7 याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो. 8 याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली. 9 मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय? 10 याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा; याहवेह मला साहाय्य करा. 11 तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली, 12 जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
