Menu

जखऱ्या 14

IRV

1 पाहा! परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल. 2 यरूशलेमेशी लढावयास मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांना लुटतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांस नगरीतून नेले जाणार नाही. 3 मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल; युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी युध्द करेल. 4 त्यावेळी, तो यरूशलेमेच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहताच तो पर्वत दुभंगेल; त्या पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल. जैतूनाच्या झाडांचा डोंगर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दुभागून एक खोल दरी निर्माण होईल. 5 तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोऱ्याकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोंचेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल; पण माझा परमेश्वर, देव तेथे येईल आणि तुमच्याबरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील. 6 आणि तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश नसेल, आणि गारठा वा कडाक्याची थंडी नसेल. 7 तो दिवस विशेष होईल तो परमेश्वरासच ठाऊक; कारण तो दिवसही नसणार वा रात्रही नसणार. तर संध्याकाळचा प्रकाशासारखा प्रकाश असेल. 8 तेव्हा यरूशलेमेतून सतत वाहणाऱ्या पाण्याचा झरा वाहील, त्यास दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाऊन पुर्वेकडील समुद्राला मिळेल तर दुसरा पाट पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल, हिवाळा असो वा उन्हाळा तो वाहत राहील. 9 त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. त्यादिवशी केवळ परमेश्वर व केवळ त्याचे नाव असणार. 10 तेव्हा सर्व देश यरूशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल. 11 लोक तेथे वस्ती करतील, ह्यापुढे त्यांचा नाश होणार नाही; यरूशलेम अगदी सुरक्षित असेल. 12 पण यरूशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील; तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील: ते आपल्या पायांवर उभे असतांनाच त्यांची कातडी कुजू लागेल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचांत आणि त्यांच्या जीभा त्यांच्या तोंडांत सडतील. 13 तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल; प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील. 14 यहूदाही यरूशलेममध्ये लढेल. भोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून संपत्ती मिळेल; त्यांना भरपूर सोने, चांदी आणि वस्रे यांचा पूर येईल. 15 ही मरी शत्रू सैन्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर आणि गाढवांवर व प्रत्येक जनावरावर ही मरी येईल. 16 यरूशलेमेशी लढण्यास आलेल्या राष्ट्रांपैकी जे वाचतील ते सर्व, सेनाधीश परमेश्वराची उपासना करण्यासाठी, मंडपाचा सण साजरा करायला, दरवर्षी यरूशलेमेला येतील. 17 पृथ्वीवरील जी सर्व कुटुंबे यरूशलेमेला प्रभूराजाची, सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला जाणार नाहीत त्यांच्या देशात परमेश्वर पाऊस पाडणार नाही. 18 जर मिसराचे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासाठी आले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; मंडपाच्या सणात जी राष्ट्रे वर चढून जाणार नाहीत त्यांच्यावर, शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जी मरी पसरवली होती, ती तो त्यांच्यावर आणिल. 19 ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिसराला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल. 20 त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील. 21 यरूशलेमेतील व यहूदातील प्रत्येक पात्र सेनाधीश परमेश्वरास पवित्र होईल; परमेश्वरासाठी यज्ञ करणारा प्रत्येकजण ही भांडी घेईल व त्यामध्ये अन्न शिजविल; त्यादिवसापासून सेनाधीश परमेश्वराच्या निवासस्थानात कनानी आणखी असणार नाहीत.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate